Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ५०

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ५०


माधव रागात गौरवीचा हात घट्ट पकडून मागे फिरतो…
“चल… इथे आपल्यासाठी काहीच नाही…”
तो ठाम आवाजात म्हणतो…

गौरवी काही बोलत नाही… पण तिच्या डोळ्यांत
आधीच पाणी भरलेलं असतं…

ते दोघं उंबरठा ओलांडणार इतक्यात...
“माधव… थांब…”
आईचा आवाज पहिल्यांदाच थोडा डगमगलेला ऐकू येतो…

माधव थांबतो… मागे वळून पाहतो… आईच्या डोळ्यांत
राग नव्हता… भीती होती…

आपला मुलगा कायमचा दुरावेल ही भीती होती…

माधवची आई पुढे येते… थोडा वेळ शांत राहते…
मग कठोर स्वरात म्हणते...
“मी तिला घरात घेईन…”

माधवच्या चेहऱ्यावर क्षणभर आशेची चमक येते…

पण लगेच माधवची आई पुढे बोलते...
“…पण काही अटींवर...”

गौरवी आणि माधव दोघंही ताठ होतात… आणि एकमेकांकडे पाहू लागतात...

माधवची आई एक एक अट सांगायला सुरुवात करते...
“ती फक्त एकाच खोलीत राहील…”
“घरातल्या कोणत्याही वस्तूला आमच्या परवानगीशिवाय हात लावणार नाही…”
“स्वयंपाकघर, देवघर, हॉल... कोठेही माझ्या परवानगीशिवाय
फिरायचं नाही…”
“आणि घरातल्या कोणाशीही मोकळेपणाने बोलायचं नाही…”
“हे घर माझं आहे... तिचं हे घर नाही हे तिने कायम लक्षात ठेवायचं…”

शेवटी ती थंडपणे पुढे बोलते...
“या अटी मान्य असतील तरच या घरात ती पाऊल ठेवू शकते…”

माधवचा संयम तुटतो…
“आई… हे घरात घेणं नाही… हा तर अपमान आहे… ही माझी बायको आहे… कैदी नाही… जर असे नियम असतील
तर आम्ही..."
तो बोलत असतानाच गौरवी पुढे येते… आणि हळू… पण ठाम आवाजात बोलते...
“मला मान्य आहेत सगळ्या अटी…”

माधव हादरतो…
“गौरवी… नकोस वेडेपणा करू…”

ती त्याच्याकडे पाहते… डोळ्यांत पाणी… पण आवाज स्थिर ठेवत बोलते...
“माधव… तू माझ्यासाठी सगळं सोडायला तयार आहेस… तर  आता मी सुद्धा थोडं सहन करू शकते… आणि एका आई मुलाची माझ्यामुळे ताटातुट होता नये... नाहीतर मी कधीच स्वतःला माफ करु शकणार नाही... आणि माधव हे घर आहे…
आणि या घरात माझी ही अस्तित्वाची लढाई आहे… आणि मी ती लढायला तयार आहे… तुझ्यासोबत... तुझ्या साथीने..."

यावर माधव काही बोलू शकला नाही…

माधवची आई एक नजर गौरवीकडे टाकते… तीच्या त्या नजरेत
स्वीकृती नव्हती… तर फक्त परवानगी होती…
“जा… ती खोली तुझी…”

गौरवी हळूच घराचा उंबरठा ओलांडते…
पण त्या क्षणी तिला कळतं... हे घर तिचं आश्रयस्थान नाही…
हे तिच्या संयमाची आणि स्वाभिमानाची
परीक्षा आहे…

घरात शब्द कमी होते… पण अर्थ जड होते…

माधव गौरवीचा हात धरतो… आणि तिला त्या खोलीकडे घेऊन जातो...
जिथे तिला काही अटींसह राहण्याची परवानगी मिळाली होती...

खोली उघडली जाते… माधव आत पाऊल टाकतो…
हीच त्याच्या लहानपणापासून बघत , खेळत असलेली खोली… पण आज तिचं अस्तित्व वेगळं वाटत होतं…

गौरवी त्या खोलीत पाऊल टाकते...

माधव दरवाजा अलगद बंद करतो…

क्षणभर दोघंही शांत उभे राहतात…

गौरवी हळूच म्हणते…
“घरात तर  आलो… पण आता मागे जाणार नाही…”

माधव तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन देतो…
“आता ही लढाई एकटीची नाही… आपली आहे…”

आणि त्या छोट्याशा खोलीत
एक मोठा संघर्ष नव्या सुरुवातीसह शांतपणे उभा राहतो…

गौरवी आता पळून आलेली मुलगी नव्हती…
तर ती कायदेशीर पत्नी होती…
आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी उभी असलेली स्त्री होती…


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all